GRAMIN SEARCH BANNER

खेर्डी परिसरात नदीत माशांचा खच; वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Gramin Varta
24 Views

चिपळूण: चिपळूण जवळील खेर्डी परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मेलेल्या माशांचा खच आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, मेलेल्या माशांमुळे पसरलेल्या तीव्र दुर्गंधीने स्थानिक नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. नदीच्या पाण्यावर तरंगणारे शेकडो मृत मासे पाहून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, हा सर्व प्रकार औद्योगिक सांडपाण्यामुळेच घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्रात अचानक शेकडो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसले. नदीकाठी मोठ्या प्रमाणावर वस्ती असल्याने या मेलेल्या माशांची दुर्गंधी थेट घरांपर्यंत पोहोचत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात कोणतीही गंभीर रोगराई पसरण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हालचाल करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे जलस्रोत प्रदूषित होणे ही चिंतेची बाब असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
या दुर्घटनेचे मूळ खेर्डी एमआयडीसीमधील कंपन्यांनी सोडलेल्या रासायनिक सांडपाण्यात असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

औद्योगिक प्रक्रियेतील दूषित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही अनेकदा करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित विभागाने या घटनेची सखोल चौकशी करून पाण्याचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण चिपळूण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3344953
Share This Article