राजापूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामाळ परिसरात आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा एक ट्रक गोवा ते मुंबई या दिशेने जात असताना ओणी तिवंदामाळ येथील एका धाब्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. याच दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या भरधाव ट्रकने या उभ्या ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की भारत बेंझ ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण दुर्घटनेत भारत बेंझ ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली तसेच घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर पोलीस या अपघाताचा पुढील कायदेशीर तपास करीत आहेत.







