GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्रातील सात, देशातील १७ खासदार संसदरत्न पुरस्काराने सन्मानित

मुंबई : प्राइम फाउंडेशनच्या वतीनं लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार सोहळा राजधानी दिल्लीत केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत पार पडला.

देशातील 17 खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांना हा पुरस्कार दिला गेला. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचाही समावेश आहे.

संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खासदारांना दरवर्षी ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये महाराष्ट्रातील खासदार स्मिता वाघ (भाजप), मेधा कुलकर्णी (भाजप), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), श्रीरंग बारणे (शिवसेना), नरेश म्हस्के (शिवसेना), अरविंद सावंत (शिवसेना- उबाठा) आणि वर्षा गायकवाड (काँग्रेस) या सात खासदारांचा संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

याशिवाय देशातील भर्तृहरी महताब (भाजप, ओडिशा), एन.के. प्रेमचंद्रन (आरएसपी, केरळ), भाजप खासदार प्रवीण पटेल, भाजप खासदार रवी किशन, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे, भाजप खासदार बिद्युत बरन महतो, भाजप खासदार पी.पी. चौधरी, भाजप खासदार मदन राठोड, डीएमके खासदार सी.एन. अण्णादुराई आणि भाजप खासदार दिलीप सैकिया यांचाही यात समावेश आहे.

राज्यनिहाय पाहिल्यास यावर्षी महाराष्ट्रातील ७ खासदारांना पुरस्कार मिळाले आहेत. तसेच उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानला प्रत्येकी २, ओडिशा, तामिळनाडू, केरळ आणि आसाम राज्यातील प्रत्येकी एका खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. संसदेत सादर केलेल्या अहवालांच्या आधारे स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे. अर्थविषयक स्थायी समिती, अध्यक्ष भर्तृहरी महताब (भाजपा, ओडिशा) आणि कृषीविषयक स्थायी समिती, अध्यक्ष डॉ. चरणजित सिंग चन्नी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पंजाब) यांचाही यात समावेश आहे.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 1999 या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार, 2010 मध्ये प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांनी संसद रत्न पुरस्कारांची स्थापना केली. मे 2010 मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉ. कलाम यांनी केले होते. उल्लेखनीय म्हणजे, हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले मानकरी होते. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो.

नागरी समाजाच्या वतीने हे पुरस्कार प्रदान केले जातात. 2024 पर्यंत, 14 पुरस्कार समारंभांमध्ये 125 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामध्ये वैयक्तिक संसद सदस्य आणि संसदीय स्थायी समित्यांचा समावेश आहे. प्रतिष्ठित पुरस्कार विजेते संसद सदस्य आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली निवड समिती कामगिरीच्या डेटाच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची नामांकने करते. हा डेटा लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांच्या अधिकृत नोंदी तसेच पीआरएस कायदेविषयक संशोधनातून मिळवला जातो. कामगिरी निर्देशकांमध्ये सुरू झालेल्या वादविवादांची संख्या, खाजगी सदस्यांची विधेयके सादर करण्यात आली आणि उपस्थित केलेले प्रश्न यांचा समावेश आहे.

Total Visitor Counter

2455606
Share This Article