चिपळूण : बहादूरशेख नाका येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून त्यातील महत्त्वाच्या टप्प्यात पिलरवर महाकाय गर्डर चढवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. क्रेनच्या साहाय्याने हे गर्डर बसवण्याचे काम सुरू असून, सुरक्षेचा उपाय म्हणून बहादूरशेख नाक्याच्या मुख्य चौकातून खेर्डीकडे आणि बाजारपेठेत ये-जा करणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग आणि गुहागर-विजापूर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा चौक असलेल्या बहादूरशेख नाक्यावर दोन वर्षांपूर्वी उड्डाणपूल कोसळल्यामुळे डिझाईनमध्ये बदल करण्यात आला होता. या पुलाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून, चौकातील मुख्य ठिकाणी गर्डर बसवण्याचे काम बाकी होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी व सोमवारी पहाटे महामार्गावरील वाहतूक थांबवून पोलीस बंदोबस्तात क्रेनच्या साहाय्याने गर्डर पिलरवर यशस्वीरीत्या चढवण्यात आले. या कामाच्या पार्श्वभूमीवर बहादूरशेख चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आगामी ऑगस्ट अखेरपर्यंत उड्डाणपुलावरील सर्व गर्डर बसवून काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, गर्डर बसवण्याच्या या तीव्र गतीमुळे प्रवाशांना काही काळ वळसा घालून वाहतूक करावी लागत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.






