GRAMIN SEARCH BANNER

जेष्ठ चित्रकार,शिल्पकार चंद्रजित यादव यांना सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

संगमेश्वर:- शिल्पकला क्षेत्रातील एक तेजस्वी तारा आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. भारतातील जेष्ठ चित्रकार व सुप्रसिद्ध शिल्पकार चंद्रजित यादव  यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून, कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्त्यांच्या दुःखद निधना मुळे सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे आज विद्यार्थी आणि प्राध्यापकां श्रद्धांजली वाहिली.

चंद्रजित यादव हे देश-विदेशातील सार्वजनिक ठिकाणे आणि कलादालनं आपल्या अप्रतिम शिल्पकलेने समृद्ध करणारे एक दिग्गज कलाकार होते. त्यांनी कांस्य, मार्बल, रिलीफ इत्यादी माध्यमांतून अनेक भव्य शिल्पांची निर्मिती केली. रायगड किल्ल्यावर उभारलेले राजमाता जिजाऊ भोसले यांचे भव्य कांस्य शिल्प हे त्यांचे एक अतुलनीय कार्य आहे. तसेच नामांकित नेते, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांच्या मूर्ती, स्मारके आणि सार्वजनिक ठिकाणावरील कलाकृतींमधून त्यांनी आपल्या कलात्मक प्रतिभेचे दर्शन घडवले.

त्यांनी कोल्हापूर, सांगली, पुणे आणि मुंबई येथील प्रतिष्ठित कला संस्थांमधून चित्रकला व शिल्पकला या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या कला प्रवासात   महाराष्ट्र राज्यातील कला स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले. यामध्ये महाराष्ट्र स्टेट आर्ट प्रदर्शन स्टुडन्ट डिव्हिजन मध्ये प्रथम क्रमांक, तसेच प्रोफेशनल डिव्हिजन मध्ये राज्य पुरस्कार व पदकांचा समावेश आहे.

सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्प कला महाविद्यालयाशी  त्यांचा जिव्हाळ्याचा ऋणानुबंध होता. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी अनेक वेळा प्रात्यक्षिके दिली. विशेष म्हणजे, सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतलेल्या मातीमधील पोर्ट्रेट प्रात्यक्षिकाला त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटी कडून नॅशनल अवॉर्ड आणि मेडल अर्थात राष्ट्रीय पुरस्कार आणि पदक  प्राप्त झाले, जे राष्ट्रीय पातळीवरील एक मानांकन आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांचे ब्रॉझ मधील शिल्प सावर्डे वहाळफाटा येथील समाधीजवळील स्मृतिगंध या म्युझियममध्ये त्यांनी तयार केले. तसेच कृषी महाविद्यालय, खरवते येथेही त्यांनी पूर्णाकृती शिल्पाची निर्मिती केली. त्यांनी प्रा. प्रकाश राजेशिर्के यांचे पोर्ट्रेट सुद्धा अत्यंत उत्कृष्टतेने साकारले, आणि प्रा. प्रकाश राजेशिर्के यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण मैत्रीचे संबंध होते. सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट परिवारा तर्फे  या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

Total Visitor Counter

2456040
Share This Article