GRAMIN SEARCH BANNER

लांजात वकिल असल्याचे भासवून ४५ हजार रुपयांची फसवणूक; एकावर गुन्हा

लांजा : वकील असल्याचे भासवून एकाने लांजा तालुक्यातील आसगे येथील एका शेतकऱ्याची तब्बल ४५,११० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने फिर्यादीची गाडी भाड्याने घेतली, पैसे दिले नाहीत, तसेच मोबाईल आणि नारळ घेऊनही पैसे न दिल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन गणपत जाधव (वय ५५, चालक, रा. तानाखरे, भगवती मंदिर, ता.जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

लांजा तालुक्यातील आसगे, मांडवकरवाडी येथील बाबाजी बुधाजी कोलापटे (वय ६२, शेती व्यवसाय) यांनी लांजा पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, जीवन गणपत जाधव याने २३ जून २०२५ ते २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान त्यांची फसवणूक केली. जाधव याने कोलापटे यांना आपण वकील असल्याचे सांगितले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, त्याने त्यांची वॅगनार कार भाड्याने घेतली, मात्र त्याचे ३७,००० रुपये दिले नाहीत. एवढंच नाही, तर जाधवने कोलापटे यांना ‘जेल कॅन्टीनचे काम देतो’ असे आमिष दाखवून त्यांचा ५,००० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल (ज्यात कोलापटे यांच्या नावाचे सिमकार्ड होते) वापरण्यासाठी घेतला.
याव्यतिरिक्त, आरोपी जाधवने आपल्या नातीच्या ‘शांती’चे कारण सांगून कोलापटे यांच्याकडून १११० रुपये किमतीचे ३७ नारळ घेतले, त्याचेही पैसे दिले नाहीत. अशा प्रकारे, आरोपी जीवन जाधवने कोलापटे यांची एकूण ४५,११० रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या मालामध्ये ५,००० रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, २,००० रुपयांचा नोकिया कंपनीचा हँडसेट, १११० रुपयांचे ३७ नारळ आणि ३७,००० रुपयांचे वॅगनार कारचे भाडे यांचा समावेश आहे.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात जीवन गणपत जाधव फौजदारीपात्र न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article