GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेत २२ रुग्णांचे निदान

Gramin Varta
83 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून जिल्हा आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली. या अभियानात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन ग्रामीण व शहरी भागातील मिळून सुमारे १४ लाख ९३ हजार ५४८ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ८ हजार ४४४ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी अंतिम तपासणीनंतर २२ कुष्ठरोग रुग्णांचे निदान झाले आहे. संबंधित रुग्णांवर बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.

सन २०२७ पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्याचे, म्हणजेच ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, रत्नागिरी यांच्यामार्फत १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली, अशी माहिती प्रभारी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. परवेज पटेल यांनी दिली.
ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली आहे.

मोहीम संपली असली तरी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये वर्षभर तपासणी सुरू राहणार आहे. त्वचेवर फिकट किंवा लालसर, बधिर व संवेदनाहीन एक किंवा अनेक चट्टे दिसणे, त्वचा तेलकट किंवा गाठीदार होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तळहात व तळपायावर मुंग्या येणे, तसेच हात-पायांची बोटे वाकडी होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3199514
Share This Article