GRAMIN SEARCH BANNER

गणपतीपुळे मंदिरात आजपासून भाविकांना मोफत नाश्ता; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय

Gramin Varta
1.1k Views

गणपतीपुळे: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, याचे पडसाद आता पर्यटन क्षेत्रावर उमटू लागले आहेत. गॅस टंचाईमुळे गणपतीपुळे परिसरातील उपहारगृहे आणि हॉटेल्समध्ये भाविकांच्या खाण्यापिण्याची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेता, श्री देव गणपतीपुळे संस्थानने एक अत्यंत स्तुत्य आणि मोठा निर्णय घेतला आहे. आज, बुधवार १ एप्रिलपासून मंदिर परिसरात सर्व भाविकांसाठी मोफत नाश्त्याची सोय करण्यात आली असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे दररोज पर्यटकांची मोठी वर्दळ असते.

मात्र, सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल चालकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे, तर काही ठिकाणी सेवा देणे कठीण झाले आहे. भाविक आणि पर्यटकांची ही कोंडी फोडण्यासाठी देवस्थान समितीने पुढाकार घेतला आहे. मंदिर प्रशासनाने लावलेल्या अधिकृत फलकानुसार, सकाळी ८ ते १० या वेळेत भाविकांना मोफत नाश्ता दिला जाणार आहे. गॅस पुरवठा पूर्ववत होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
नाश्त्यासोबतच समितीने दुपारच्या आणि रात्रीच्या महाप्रसादाच्या वेळेतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लांबून येणाऱ्या भाविकांना मोठा आधार मिळाला असून परिसरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. गॅस संकटामुळे उद्भवलेल्या या आणीबाणीच्या काळात भाविकांची उपासमार होऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून देवस्थानने उचललेले हे पाऊल सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. विविध प्रांतातून येणाऱ्या भाविकांनी देवस्थानच्या या तत्पर सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Total Visitor Counter

3391816
Share This Article