निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेची जोरदार निदर्शने
रत्नागिरी: १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्गावरील निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते. ‘महामार्गाचे खड्डे झाले खोल, अपूर्ण कामाचा सरकारवर बोल’, ‘कोकणवासियांच्या जीवाशी खेळणे बंद करा’, पूर्ण करा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा’ अशा गगनभेदी घोषणांनी पत्रकारांनी परिसर दणाणून सोडला.
आज शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट सरकारचे लक्ष वेधून घेणे हे होते. गेली अनेक वर्षे हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे सतत अपघात होत असून, यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मराठी पत्रकार परिषद सुरुवातीपासूनच हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याची मागणी करत आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने पत्रकारांनी शनिवार १६ ऑगस्ट रोजी थेट रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात ‘यमदूता’ची भूमिका साकारणाऱ्या एका पत्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला तो ‘सावकाश जा, पुढे खड्डे आहेत’ असा संदेश देत होता. यामुळे या आंदोलनाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आणि महामार्गाची भीषण स्थिती अधिक प्रभावीपणे लोकांसमोर आली.
कोकणी जनतेला सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली आहेत, अनेक डेडलाईन देण्यात आल्या, मात्र त्यापैकी एकही डेडलाईन पाळली गेली नाही, असा आरोप पत्रकारांनी केला. अनेक सार्वजनिक बांधकाम मंत्री बदलले, त्यांनी फक्त पाहणी दौरे केले, पण मुंबई-गोवा महामार्ग मात्र रखडलेलाच आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही पाहणी दौरा केला होता, तेव्हाही कोकणी जनतेला फक्त आश्वासनेच मिळाली. सरकार कोकणी जनतेच्या सहनशीलतेचा अंत किती दिवस पाहणार, असा संतप्त सवालही पत्रकारांनी उपस्थित केला.
पोलिसांनीही या आंदोलनाला सहकार्य केले आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती आणि त्यामुळे होणारे हाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता तरी सरकार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने मार्ग पूर्ण करेल, अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत. यावेळी रत्नागिरी, लांजा तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.