GRAMIN SEARCH BANNER

वाढीव पेन्शन मिळण्यात तांत्रिक अडचणी; राजापुरात दिव्यांग बांधवांचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Gramin Varta
88 Views

राजापूर : शासनाने दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये वाढ करून ती अडीच हजार रुपये केली असली तरी, राजापूर तालुक्यातील असंख्य दिव्यांगांच्या खात्यात अद्याप जुनीच १,५०० रुपये रक्कम जमा होत असल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी राजापूर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा लाभ मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार व दिव्यांग पेन्शन योजनेतील रक्कमेत १,००० रुपयांची वाढ केली होती. या निर्णयानुसार दिव्यांग बांधवांना आता १,५०० रुपयांवरून २,५०० रुपये पेन्शन मिळणे अपेक्षित होते. सप्टेंबर महिन्यापासून ही वाढीव पेन्शन लागू झाल्याचे शासन परिपत्रकही निघाले होते. मात्र, राजापूर तालुक्यातील बहुतांश दिव्यांगांच्या बँक खात्यात अद्यापही केवळ दीड हजार रुपयेच जमा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. संजय गांधी निराधार योजनेतील केवळ दिव्यांगानाच ही वाढ लागू असल्याने, शासनाने नव्याने जाहीर केलेला ‘युडीआयडी’ (UDID) कार्ड क्रमांक प्रणालीत नोंदवल्यानंतरच ही वाढीव रक्कम मिळणार होती.

राजापूर तहसील कार्यालयात अनेक दिव्यांगांनी आपले युडीआयडी कार्ड आणि आधारकार्ड वेळेत जमा केले होते. तरीही या महिन्यात त्यांच्या खात्यावर जुनीच रक्कम जमा झाली. या संदर्भात तहसील कार्यालयात चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. राजापूर तालुक्यात एकूण १,००० दिव्यांग लाभार्थी असून, त्यातील ४५७ दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड क्रमांक टाकून त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. मात्र, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून ही माहिती शासनाकडे वेळेत न गेल्यामुळे या महिन्यात संबंधित लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन मिळू शकली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सद्यस्थितीत तालुक्यातील १,००० दिव्यांगांपैकी केवळ १२१ दिव्यांगांच्याच खात्यात वाढीव अडीच हजार रुपये जमा झाले आहेत. प्रशासकीय स्तरावर झालेली दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे हा गोंधळ उडाला आहे. राजापूर तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेल्या ४५७ दिव्यांगांना पुढील महिन्यापासून अडीच हजार रुपये पेन्शन मिळावी, यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमकपणे पाठपुरावा करेल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी यावेळी दिले. तसेच, ज्या दिव्यांगांनी अद्याप आपले युडीआयडी कार्ड सादर केलेले नाही, त्यांनी ते त्वरित सादर करावे, अन्यथा त्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार नाही, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3237278
Share This Article