देवरुख: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून देवरुख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी आपल्या कलेतून एक आगळीवेगळी मानवंदना दिली आहे. नदीतील एका अवघ्या तीन ते चार इंचाच्या लंबगोलाकार दगडावर रांगोळीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा रेखाटून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्या नकाशावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्मा स्मारकाची हुबेहूब प्रतिमा साकारण्याचा अप्रतिम प्रयत्न केला असून, त्यांच्या या सूक्ष्म कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जपण्यासाठी विलास रहाटे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. अत्यंत कमी जागा उपलब्ध असलेल्या या दगडावर संपूर्ण नकाशा आणि त्यावरील प्रतिमा अचूकपणे उमटवण्यासाठी त्यांना सुमारे एका तासाचा कालावधी लागला. रांगोळी क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने हे काम पूर्ण केले. या छोट्याशा दगडावर साकारलेली ही कलाकृती पाहण्यासाठी स्थानिक नागरिक गर्दी करत असून, या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र दिनाचा उत्साह अधिक द्विगुणित केला आहे.
विलास रहाटे यांनी यापूर्वीही आपल्या रांगोळी कलेच्या जोरावर अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या त्यांच्या आवडीतून ही दगडावरील रांगोळी आकारास आली आहे. राज्याच्या नकाशासह क्रांतीचे प्रतीक असलेले हुतात्मा स्मारक आणि आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा एकाच वेळी या छोट्या दगडात गुंफून त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास कलेच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे देवरुखच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून कला क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






