GRAMIN SEARCH BANNER

एसटी बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा राडा; चालकासह वाहकाला मारहाण, चिपळूण पोलिसांत गुन्हा

Gramin Varta
184 Views

चिपळूण: चिपळूण-तिवरे या एसटी बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली आहे. या प्रवाशाने केवळ शिवीगाळच केली नाही, तर चालकाच्या शर्टाचा खिसा फाडून त्याला जखमी केले, तसेच झटापटीत वाहकाचे पैसेही गहाळ झाले आहेत. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास एसटी बस (क्र. एमएच २० बीएल २४३७) तिवरे गावाकडे जात असताना हा प्रकार घडला. बसमधील प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंतच असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. याचा राग येऊन प्रकाश कोकरे याने वाहक आणि चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) यांच्याशी विनाकारण वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने चालकाला हाताने मारहाण केली, ज्यामध्ये चालकाच्या चेहऱ्यावर नखे लागून दुखापत झाली आहे. या झटापटीत चालकाच्या शर्टाचा खिसा फाटला असून वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील ८०० रुपये बसमध्येच पडून गहाळ झाले आहेत.

शासकीय कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश कोकरे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3199393
Share This Article