GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : दाभोळेतील एस.टी. पिकअप शेडची दुरावस्था; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
315 Views

ग्रामस्थ त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम

सिकंदर फरास / दाभोळे

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या दाभोळे गावातील एस.टी. पिकअप शेड सध्या अक्षरशः जीर्णावस्थेत आहे. ही शेड पडकी असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले हे शेड आता मोडकळीस आली असून, त्याकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामस्थ आणि सरपंच श्री. राजेश रेवाळे यांनी या समस्येकडे लक्ष वेधले असून, “ही जागा एस.टी. महामंडळाची असली तरी देखभालीकडे कोणी लक्ष देत नाही. वैयक्तिक लाइट मीटर असूनही रात्री प्रवाशांना प्रकाशाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही,” असे त्यांनी सांगितले.

दररोज दाभोळे आणि परिसरातील गावांमधून अनेक प्रवासी या ठिकाणी ये-जा करतात. याच मार्गावरून कोल्हापूरलाही जाणारे अनेक प्रवासी असतात. या ठिकाणी कायम वर्दळ असते. मात्र, पिकअप शेडचे छप्पर गळके झाले असून लोखंडी खांब गंजले आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे उभे राहणेही कठीण जाते, तर उन्हाळ्यात सावलीअभावी प्रवाशांना त्रास सहन करत उभे रहावे लागत आहे.

“एस.टी. बसेस येथे थांबतात, पण प्रवाशांना बसायची सोय नाही. विशेषतः महिलांना मोठा त्रास होतो,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक ग्रामस्थाने दिली.

ग्रामस्थांच्या तक्रारी असूनही परिवहन विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गावात नाराजीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांचे मागणीपत्र स्पष्ट आहे —
“दाभोळे एस.टी. पिकअप शेडची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा पुरवाव्यात, तसेच रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था सुरू करावी.”

Total Visitor Counter

3366874
Share This Article