आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश;चिपळूणकरांच्या प्रतीक्षेला अखेर दिलासा
चिपळूण (प्रतिनिधी) : शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रा.प. रत्नागिरी विभागातील चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असून, चिपळूण शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसह चालक–वाहक विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामांच्या निविदा प्रक्रियेला तात्काळ सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चिपळूण शहरातील ही दोन्ही बसस्थानके गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या सुविधा, मोडकळीस आलेली इमारत, अस्वच्छता आणि मूलभूत सोयींच्या अभावामुळे प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. दररोज हजारो प्रवासी या बसस्थानकांचा वापर करत असून, पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर होत होती. चालक व वाहकांसाठी विश्रांतीसाठी स्वतंत्र व सुसज्ज सुविधा नसल्याने त्यांच्यातही तीव्र नाराजी होती.
ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेत आमदार शेखर निकम यांनी हा प्रश्न गांभीर्याने हाती घेत शासन स्तरावर सातत्यपूर्ण व ठाम पाठपुरावा केला. चिपळूण शहराची वाढती लोकसंख्या, दळणवळणाची भविष्यातील गरज, प्रवाशांची गैरसोय आणि सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी हा विषय प्राधान्याने मांडला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत, या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या निधीमुळे चिपळूणकरांना आधुनिक, सुरक्षित व सुसज्ज बसस्थानकांच्या सुविधा मिळणार असून, प्रवाशांसह चालक व वाहकांसाठीही आवश्यक सोयी उपलब्ध होणार आहेत. यामुळे चिपळूण शहराच्या एकूणच विकासाला चालना मिळणार आहे.
या निधी मंजुरीबद्दल आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक तसेच पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत.
तसेच चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणी व चालक–वाहक विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी सुरज शिंदे (शिरगांव) यांचेही सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
चिपळूणच्या विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात काम करून दाखवण्याची भूमिका आमदार शेखर निकम यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. प्रवाशांच्या सोयीसुविधा, कामगारांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाबाबत असलेली त्यांची तळमळ या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते. चिपळूणकरांसाठी ही निधी मंजुरी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नसून, शहराच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे आणि ठोस पाऊल असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती व शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीसाठी ७ कोटींचा निधी मंजूर







