गुहागर: तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सिमेंट काँक्रीटचा तयार माल घेऊन जाणारा चाळीस टनांचा टँकर पलटी झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकर पलटी झाल्यामुळे बाजूला असलेल्या एका घराचे मोठे नुकसान झाले.
गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे एका मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी आबलोली बाजारपेठेतून सिमेंट काँक्रीटचा तयार माल घेऊन हा टँकर जात होता. आबलोली बाजारपेठेजवळ विनोद कदम यांच्या घराजवळ टँकर अचानक उलटला. या अपघातात टँकरमधील काँक्रीट रस्त्यावर पसरले आणि विनोद कदम यांच्या घराची भिंत कोसळून घराचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच आबलोली ग्रामपंचायतच्या सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पा कदम, पोलीस पाटील महेश भाटकर, प्रमेय आर्यमाने, दत्ताराम कदम, योगेश पालशेतकर, संजय कदम, चंद्रकांत कदम यांच्यासह आबलोली उपपोलीस ठाण्याचे पोलीस, गुहागर बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. सुदैवाने, रात्रीची वेळ असूनही कोणतीही व्यक्ती टँकरच्या खाली किंवा आजूबाजूला नसल्याने मोठी दुर्घटना टळली.