GRAMIN SEARCH BANNER

प्रादेशिक परिवहन विभाग नेमका कुणाच्या दावणीला?

Gramin Varta
27 Views

तळे–कांटे ते आरवली महामार्गावर ठेकेदारांची मनमानी, नियमांची खुलेआम चिरफाड; सर्वसामान्यांचे जीव मात्र स्वस्त!

संगमेश्वर/एजाज पटेल : तळे कांटे ते आरवली दरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाच्या नावाखाली सध्या कायद्याची थट्टा सुरू असून रस्त्यावर नियम नव्हे तर ठेकेदारांची मर्जी चालते आहे. रोजच्या रोज हातावर पोट असणाऱ्या वाहनचालकांवर हेल्मेट, कागदपत्रे व किरकोळ कारणांसाठी कारवाईचा बडगा उगारणारा आर. टी. ओ  विभाग या महामार्गावर मात्र गाढ झोपेत गेला आहे की जाणीवपूर्वक डोळे मिटून बसला आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

या मार्गावर धावणाऱ्या असंख्य वाहनांना नंबर प्लेटच नसल्याचे उघडपणे दिसत आहे. काही गाड्यांना पुढे नंबर नाही, काहींचे नंबर मागे लटकवलेले, तर अनेक गाड्यांचे नंबर माती- डांबराने पूर्णपणे झाकलेले आहेत. एखादा अपघात घडल्यास दोषी वाहन ओळखायचे कसे, पोलिस तपास कसा होणार, हा प्रश्न आर. टी. ओ  अधिकाऱ्यांना का पडत नाही, असा संतप्त सूर उमटत आहे. की या वाहनांना “अपघात झाला तरी चालेल” असा मोकळा परवाना दिला आहे?

क्षमता ओलांडून डबर, माती व गौण खनिजांची वाहतूक सुरू असून कोणतेही आच्छादन नसल्याने संपूर्ण रस्ता धुळीच्या ढगात हरवून जात आहे. दुचाकीस्वारांच्या डोळ्यात, अंगावर धूळ जाते, पाठीमागील वाहनचालक अक्षरशः अंधारात वाहन चालवतात. याच मार्गावर उघड्या व फाळक नसलेल्या गाड्यांमधून दगड पडून पादचारी व दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडूनही प्रशासनाच्या कपाळावर आठीही पडलेली नाही.

वेगावर कुठलेही नियंत्रण नाही, नियमांची कोणतीही भीती नाही. काही चालक बेदरकारपणे गाड्या उडवत असल्याने याच महामार्गावर यापूर्वी अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे नाहक जीव गेले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले, अनेक जण गंभीर जखमी झाले. तरीही ही वाहने साईड इंडिकेटरशिवाय, रेडियमशिवाय, पुरेशा प्रकाशाविना रात्रीच्या अंधारात धावत आहेत. ही वाहने नाहीत, तर रस्त्यावर फिरणारे मृत्यूचे सापळे आहेत.

इतक्या उघडपणे नियम मोडले जात असताना या वाहनांचे पासिंग नेमके कसे होते, हा प्रश्न आता जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरतो आहे. नियम धाब्यावर बसवून पासिंग दिले जाते का, की ठेकेदार कंपनीसाठी वेगळे कायदे, वेगळे नियम आहेत? सामान्य वाहनचालकाच्या कागदात एक चूक झाली तर दंड, जप्ती, कारवाई होते; मात्र ठेकेदारांच्या गाड्यांसमोर कायदा नतमस्तक का होतो, हा प्रश्न आता रस्त्यावरून ओरडू लागला आहे.

आर. टी. ओ  विभागाने तात्काळ जागे व्हावे. हा विषय केवळ वाहतूक नियमांचा नसून सर्वसामान्यांच्या जीव-मरणाचा आहे. आजही डोळेझाक केली गेली तर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर जबाबदारी झटकता येणार नाही. कायद्याचा बडगा जर सर्वांसाठी समान असेल, तर तो ठेकेदारांच्या गाड्यांवरही उगारला गेला पाहिजे. अन्यथा आरव. टी. ओ  विभाग हा जनतेसाठी नसून ठेकेदारांचा संरक्षक असल्याचा ठपका बसल्याशिवाय राहणार नाही.

Total Visitor Counter

3073122
Share This Article