गुहागर/ उदय दणदणे: पालशेत बाजारपेठेत गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झालेल्या विद्युत खांबांमुळे निर्माण झालेला धोका अखेर दूर झाला आहे. ‘ग्रामीण वार्ता’ वृत्तपत्राने या समस्येची दखल घेतल्यावर आणि विविध संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर महावितरण कंपनी खडबडून जागी झाली आणि त्यांनी तातडीने धोकादायक खांब बदलला. यामुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गेले काही दिवस पालशेत बाजारपेठेतील सत्यवान भायनाक यांच्या कुटुंबाला विद्युत पुरवठा बंद असल्याने अंधारात राहावे लागत होते. त्यांच्या घराशेजारील दीपक शिरगावकर यांच्या दुकानासमोरचा खांब अत्यंत जीर्ण झाला होता. त्यावर सतत स्पार्किंग होत असल्याने तो धोकादायक बनला होता, परिणामी लाईनमनलाही त्यावर चढून काम करणे अशक्य झाले होते.
ही समस्या भायनाक यांनी मनसेचे पालशेत विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांना सांगितली. विखारे यांनी तात्काळ महावितरणच्या पालशेत व्यवस्थापकाशी आणि गुहागर येथील उपअभियंत्यांशी संपर्क साधून धोकादायक खांब बदलण्याची मागणी केली. याच दरम्यान, ‘ग्रामीण वार्ता’मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
या सर्व पाठपुराव्यानंतर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ कार्यवाही करत पालशेत येथील जीर्ण झालेला विद्युत खांब बदलून टाकला. त्याचबरोबर, भायनाक यांच्या घराचा वीजपुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, महावितरणच्या या तात्काळ कारवाईचे स्वागत केले आहे.