GRAMIN SEARCH BANNER

महाडजवळ कारच्या धडकेत चिमुरडीचा जागीच मृत्यू, ग्रामस्थांचा उद्रेक

Gramin Varta
378 Views

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची भयावह मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, महाडजवळ घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने पुन्हा एकदा महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरधाव स्वीफ्ट कारने दिलेल्या धडकेत शरण्या दवंडे या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचा नऊ वर्षांचा भाऊ शिवम गंभीर प्रसंगातून थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

घटनेच्या वेळी शरण्या आणि शिवम हे दोघे रस्त्याच्या कडेला पायी चालत होते. मात्र, रस्त्याची अवस्था आणि पादचाऱ्यांची उपस्थिती याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कारचालकाने दोघांनाही जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत शरण्या जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरहान अब्दुल कादिर ताजीर (रा. अप्पर तुडील, महाड) घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत त्याला शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी महाड पोलीस ठाण्याकडे धाव घेत चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत ठाण्याला घेराव घातला. दरम्यान, अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Total Visitor Counter

3367960
Share This Article