GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण ओवळी येथे गुरांच्या गोठ्यात वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

Gramin Varta
6 Views

चिपळूण : तालुक्यातील मौजे ओवळी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर ११ जुलै रोजी रात्री बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे.

६ जुलैपासून श्री. विलास मोहिते यांच्या गोठ्यात बिबट्या सातत्याने आढळून येत होता. त्यांनी यासंदर्भात तातडीने वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपाल एस. एस. सावंत (चिपळूण), वनरक्षक कृष्णा इरमले (कोळकेवाडी) आणि राहुल गुंठे (रामपूर) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान बिबट्या प्रत्यक्ष गोठ्यात दिसून आला. सुरुवातीला काही वेळ त्याला पळवून लावण्यात यश आले, मात्र काही वेळातच तो पुन्हा परतू लागला.

सतत होत असलेल्या या घटनांमुळे वनविभागाने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावले, मात्र बिबट्या याकडे दुर्लक्ष करून नेहमीसारखा गोठ्यातच थांबत होता. तपासणीदरम्यान बिबट्या आजारी आणि अशक्त असल्याचे आढळले. त्यामुळे अधिक नियोजनबद्ध कारवाईची गरज भासली.

११ जुलै रोजी विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांच्या सूचनेनुसार सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांनी घटनास्थळी भेट देत पिंजऱ्याचे स्थान बदलले. श्री. मोहिते यांच्या गोठ्यातच ट्रॅप पिंजरा लावून त्यामध्ये भक्ष ठेवण्यात आले. त्या रात्री ८.३० वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अंदाजे ४ ते ५ वर्षांचा नर असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मानेवर जखमही आढळली. त्यामुळे तात्काळ वनविभागाच्या अँब्युलन्सद्वारे त्याला पुणे येथील रेस्क्यू ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.

या मोहिमेत विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, वन परिक्षेत्र अधिकारी आर. एस. परदेशी, वनपाल एस. एस. सावंत व सुरेश उपरे, वनरक्षक कृष्णा इरमले व राहुल गुंठे, तसेच वाहनचालक नंदकुमार कदम यांचे विशेष योगदान राहिले.

याशिवाय पोलिस पाटील अजिंक्य शिंदे आणि ग्रामस्थ शुभम रवींद्र शिंदे, वेदांत शिंदे, उदय कदम, दशरथ शिंदे, सुजल शिंदे, आर्यन घाग, धावू शेळके, मुंकुद हिलम, संदीप सावंत यांच्यासह गोटा मालक विलास व सुरेश शिंदे यांनीही महत्वपूर्ण सहकार्य केले. त्यांच्या एकजुटीमुळेच ही धोकादायक मोहीम यशस्वी झाली.

Total Visitor Counter

2648087
Share This Article