मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव २०२६ साठी मध्य रेल्वेने कोकण प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांचीही घोषणा केली आहे. २४ जुलै रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली.
सीएसएमटी-सावंतवाडी-सीएसएमटी दैनिक स्पेशल गाडी क्रमांक ०१०३१/०१०३२ ही १ ते २७ सप्टेंबरदरम्यान १६ फेऱ्या करणार आहे. एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी दैनिक स्पेशल गाडी क्रमांक ०१०७१/०१०७२ ही १ ते २८ सप्टेंबरदरम्यान १७ फेऱ्या करणार आहे.
याशिवाय दिवा-खेड-दिवा मेमू स्पेशल गाडी क्रमांक ०११५५/०११५६ ही १ ते २७ सप्टेंबरदरम्यान १६ फेऱ्या धावणार आहे. पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक स्पेशल गाडी क्रमांक ०९४४५/०९४४६ ही १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान धावणार असून, दिवा-चिपळूण-दिवा स्पेशल गाडी क्रमांक ०११३३/०११३४ ही १ ते २८ सप्टेंबरदरम्यान १५ फेऱ्या करणार आहे. यासोबतच एलटीटी ते मडगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी मार्गावरही साप्ताहिक आणि द्विसाप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सव प्रवास अधिक सोयीचा होण्यास मदत होणार असून, सावंतवाडी रोड स्थानकाचे महत्त्वही आणखी वाढणार आहे.






