GRAMIN SEARCH BANNER

राजापूर करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले; पंचक्रोशीतील ग्रामस्थ संतापले, आंदोलनाचा इशारा

तुषार पाचलकर/राजापूर:राजापूर तालुक्यातील करक-कारवली तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून थांबले असून, शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंचक्रोशीतील जनतेत तीव्र संताप उसळला आहे. “गणपतीपूर्वी काम सुरु करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नारायण पांचाळ यांनी दिला आहे.

गेल्या २० वर्षांपासून भाड्याच्या घरात सुरु असलेले हे आरोग्य केंद्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झाले होते. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी २०२४ च्या सुरुवातीला निधी उपलब्ध करून दिल्यानंतर जनतेला आशा होती की, आता काम गतीने पूर्ण होईल. परंतु, प्रत्यक्षात वर्षभरात एकही वीट सरकली नाही.

सध्या हे आरोग्य केंद्र तात्पुरत्या स्वरूपात श्री. नारकर यांच्या राहत्या घरात सुरु आहे. येथील जागेच्या मर्यादेमुळे मूलभूत सोयीसुविधांचा मोठा अभाव आहे. आधुनिक आरोग्य सुविधा देणारी शासकीय इमारत तातडीने उभी राहणे ही जनतेची गरज असूनही बांधकामात अक्षम्य दिरंगाई होत आहे.

या इमारतीमुळे पंचक्रोशीतील हजारो रुग्णांना वेळेवर उपचार, आपत्कालीन सेवा आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र काम रखडल्यामुळे लोकांना अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. “शासन, ठेकेदार आणि संबंधित विभाग यांनी तात्काळ लक्ष न दिल्यास गणेशोत्सवातच चाकरमान्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटवू,” असा इशारा नारायण पांचाळ यांनी दिला आहे.

स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत आणि सामाजिक संघटना यावेळी एकत्र आल्या असून, पुढील पाऊल संघर्षाचेच असणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Total Visitor Counter

2474802
Share This Article