GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: गणपतीपुळे येथे लाखोंची घरफोडी, पाच तासात पोलिसांनी लावला घरफोडीचा छडा

मेढे तर्फे फुणगुस, रत्नागिरी येथील दोघेजण ताब्यात

रत्नागिरी: जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जयगड पोलिसांनी गणपतीपुळे येथील एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या पाच तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना अटक करून चोरीला गेलेल्या ९५% मुद्देमालाची यशस्वीपणे पुनर्प्राप्ती केली आहे.

या संदर्भात, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.३० ते २७ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ च्या दरम्यान केदारवाडी-गणपतीपुळे येथील रहिवासी वीरेंद्र शांताराम गोसावी (वय ४२) यांच्या बंद घराचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकर उचकटून चोरट्यांनी २,३६,२०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी वीरेंद्र गोसावी यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्ह्याची माहिती मिळताच, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप पाटील यांना तपासाची दिशा ठरवून तपास पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, कुलदीप पाटील यांनी दोन पथके तयार करून स्थानिक माहिती गोळा केली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले.

या तपासादरम्यान पोलिसांनी रोशन सुरेश जाधव (वय २१, रा. मेढे तर्फे फुणगुस, सध्या रा. गणपतीपुळे) आणि हैदर अजीज पठाण (वय २७, रा. झारणी रोड, सध्या रा. गणपतीपुळे) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २,२१,५३० रुपयांचा ९५% मुद्देमाल हस्तगत केला. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, यातील आरोपी हैदर अजीज पठाण याच्यावर यापूर्वी रायगड, मुंबई शहर आणि रत्नागिरी अशा तीन जिल्ह्यांमध्ये चोरी आणि घरफोडीसारखे एकूण १५ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. यात उपनिरीक्षक विलास दीडपसे, सहायक पोलीस फौजदार अनिल गुरव, पोलीस हवालदार राहुल घोरपडे, मिलिंद कदम, मंदार मोहिते, निलेश भागवत, संतोष शिंदे, संदेश मोंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सायली पुसाळकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, पवन पांगरीकर आणि आदित्य अंकार यांचा सहभाग होता.

Total Visitor Counter

2474843
Share This Article