रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एटीएम कार्ड बदलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून विविध बँकांची तब्बल चौतीस एटीएम कार्डे जप्त केली असून, या कारवाईमुळे एका मोठ्या आंतरराज्यीय फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
ही घटना रत्नागिरी शहरातील विश्वनगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात घडली. एका महिला फिर्यादी आपले नवीन एटीएम कार्ड सक्रिय करण्यासाठी गेलेल्या असताना आरोपीने त्यांना मदतीचा बहाणा करून हातचलाखीने त्यांचे कार्ड बदलले. तसेच त्यांचा मोबाईल घेऊन ओटीपीच्या माध्यमातून खात्याची खातरजमा करून घेत फसवणूक केली. महिला एटीएम केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचा संदेश मोबाईलवर आल्याने त्यांनी तत्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने हलवली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाकडील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे रत्नागिरी शहरात कसून शोधमोहीम राबवली. पेट्रोलिंग करत असताना मांडवी परिसरात संशयित इसम फिरताना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. सुरत, गुजरात) असे या जेरबंद केलेल्या सराईत आरोपीचे नाव असून, तो सध्या रत्नागिरीत राहत असलेल्या ठिकाणावरून विविध बँकांची एकूण ३४ एटीएम कार्डे हस्तगत करण्यात आली आहेत. या आरोपीच्या नावावर गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी देखील फसवणूक, चोरी आणि दरोड्याचे तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीस न्यायालयात समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या धडक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.





