खेड: रत्नागिरी जिल्ह्याच्या १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी खेड तालुक्यातील अमल सिद्दीकीची निवड झाली आहे. एका छोट्या गावातून येऊन जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खेड क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या अमलने आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ती खेड येथील एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहावीमध्ये शिकते. शिरशी (खेड) येथील मूळ रहिवासी असलेली अमल सध्या जलाल शाह मोहल्ला, भोस्ते, खेड येथे राहते.
अमल सिद्दीकी ही सलीम इशाक सिद्दीकी यांची कन्या आहे. तिच्या या यशाने सिद्दीकी कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एका छोट्या शहरातील मुलीने मिळवलेल्या या मोठ्या यशाबद्दल खेड क्रिकेट अकादमी, तिचे प्रशिक्षक, एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल आणि स्थानिक क्रिकेटप्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे.
अमलच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी जिल्हा संघ भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरेल.