GRAMIN SEARCH BANNER

पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानहून कोकणात आलेल्या कामगाराचा काळाचा घाला; पेंटिंगचे काम करणाऱ्या राजस्थानी वृद्धाचा हृदयविकाराने अंत

Gramin Varta
105 Views

रत्नागिरी: तालुक्यातील पाली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या एका ६० वर्षीय राजस्थानी कामगाराचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रताप मवाशी सिंग (वय ६०, रा. महचौली, ता. पिपला, जि. भरतपूर, राज्य राजस्थान) असे मृत कामगाराचे नाव असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रताप सिंग हे ‘ईगल कंपनी’मार्फत रत्नागिरी जिल्ह्यात रस्त्यांवरील पेंटिंगचे काम करण्यासाठी आले होते. शनिवारी, २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. दुपारी ३:४४ वाजता या घटनेची रीतसर नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. परराज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कामगाराचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेबाबत मृताच्या वारसांना माहिती दिली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे अधिक तपास पोलीस अंमलदार करत आहेत.

Total Visitor Counter

3199507
Share This Article