GRAMIN SEARCH BANNER

आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडलेल्या पाटणच्या तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
338 Views

रत्नागिरी :  येथे पर्यटनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा आंबा घाटात झालेल्या एका गूढ घटनेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुधीर अर्जुन यादव (रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर यादव हा आपला मित्र आशिष शांताराम भावके (रा. कराड) याच्यासह चारचाकी गाडीने रत्नागिरी येथे फिरण्यासाठी आला होता. रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेटी देऊन हे दोन्ही मित्र पुन्हा साताऱ्याच्या दिशेने परतत होते. प्रवासादरम्यान आंबा घाट परिसरात सुधीर हा गाडीतून खाली उतरला होता. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने त्याचा मित्र आशिष भावके हा त्याचा शोध घेत होता. दरम्यान, आंबा घाटातील रस्ता सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या हायवे पोलिसांना सुधीर हा रस्त्याच्या साईडपट्टीवर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला.

हायवे पोलिसांनी तातडीने हालचाली करत जखमी सुधीरला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली असून, रात्री ८ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुधीरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि तो जखमी अवस्थेत कसा आढळला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे यादव कुटुंबावर शोककळा पसरली असून साताऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3254622
Share This Article