GRAMIN SEARCH BANNER

चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरीसह कोकणला जोडणाऱ्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गाला गती; सात पुलांसह काँक्रीटीकरणाला सुरुवात

Gramin Varta
225 Views

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या संथ कामामुळे कोकणवासीय त्रस्त असतानाच आता कोकणातील दुसऱ्या महत्त्वाच्या ‘रेवस-रेड्डी’ सागरी महामार्गाच्या कामाला ४० वर्षांनंतर मोठी गती मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८० मध्ये मांडलेली ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरताना दिसत असून, या मार्गावरील सात प्रमुख पुलांच्या कामासह रस्ते काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या किनारपट्टीला जोडणारा हा ४९८ किलोमीटरचा महामार्ग पर्यटनाच्या दृष्टीने क्रांती घडवणारा ठरणार आहे.

या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रेवस-करंजा, रेवदंडा, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर अशा सात महत्त्वाच्या खाड्यांवर पुलांचे बांधकाम वेगाने सुरू करण्यात आले आहे. यातील १६५ किलोमीटरचा मार्ग चौपदरी असेल, तर उर्वरित मार्ग दुपदरी असणार आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग सागरी किनारी भागातून जात असल्याने कोणत्याही गावाला किंवा घरांना धोका पोहोचणार नाही, यासाठी ३३ गावे आणि शहरांमध्ये बाह्यवळण रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.

सध्या अलिबाग ते मुरुड दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू झाले असून, पुलांच्या जोड रस्त्यांसाठी १८ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रियाही प्रशासकीय पातळीवर गतिमान झाली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील रांजणखार, चौल, रेवदंडा आणि मुरुड तालुक्यातील कोर्लई, सावली, टोकेखार येथील जमिनींचा समावेश आहे. या महामार्गामुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ एक तासावर येणार असून, यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे.

Total Visitor Counter

3391871
Share This Article