GRAMIN SEARCH BANNER

देवरुख नगरपंचायत निवडणूक: सौ. दीक्षा खंडागळे यांची उमेदवारी ‘आप’च्या चिन्हावर कायम; अपक्ष अर्ज घेतला मागे

Gramin Varta
215 Views

जनहिताच्या योजनांमुळे प्रचारात आघाडी; गाव विकास समिती व ‘आप’ युतीमुळे निवडणुकीत चुरस

देवरुख (विशेष प्रतिनिधी): देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी एक महत्त्वाची राजकीय घडामोड पाहायला मिळाली. गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी (आप) युतीच्या अधिकृत उमेदवार सौ. दीक्षा रवींद्र खंडागळे यांनी अधिकृत पत्र देऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता त्या अधिकृतपणे ‘आम आदमी पार्टी’च्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सौ. दीक्षा खंडागळे यांनी आपला अतिरिक्त भरलेला अपक्ष अर्ज मागे घेतला आणि ‘आप’च्या चिन्हावरील अर्ज कायम ठेवला. गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टीची ही युती पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.

निवडणूक चिन्ह निश्चित झाल्यानंतर सौ. दीक्षा खंडागळे यांच्या प्रचाराने शहरात वेग घेतला आहे. त्यांचा प्रचार सध्या देवरुख शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, केवळ आश्वासने न देता थेट लोकांच्या हिताच्या आणि दैनंदिन जिव्हाळ्याच्या योजना त्यांनी मांडल्या आहेत. या कल्पक आणि वास्तववादी योजनांमुळे मतदारांमधून त्यांना उत्स्फूर्त समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.

शुक्रवारच्या घडामोडींमुळे देवरुख नगराध्यक्षपदाची निवडणूक आता अधिक अटीतटीची आणि रंगतदार होणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Total Visitor Counter

3199422
Share This Article