राजापूर : शिमगोत्सवात ग्रामदैवतेची पालखी घरोघरी येत नसल्याने चर्मकार समाज आक्रमक; जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धरणे आंदोलन

राजापूर : तालुक्यातील हातदे गावामध्ये ग्रामदैवतेच्या पालखी मिरवणुकीत अनुसूचित जातीच्या कुटुंबांना डावलले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या जातीय भेदभावाविरोधात चर्मकार समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. समस्त चर्मकार समाज आणि श्री संत रोहिदास प्रतिष्ठानच्या वतीने यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाकडून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावातील पारंपरिक शिमगोत्सवात ग्रामदैवतेची पालखी घरोघरी नेली जाते, मात्र चर्मकार समाजाच्या वस्तीत ही पालखी आणण्यास सवर्ण समाजाकडून मज्जाव केला जात असल्याचा आरोप निवेदक भावेश दत्ताराम धामापूरकर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी तहसीलदार कार्यालयाने रूढी-परंपरेचे नाव देऊन पालखी चर्मकार समाजाच्या घरी न नेताच उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले होते, ज्याला निवेदकांनी असंविधानिक आणि बेकायदेशीर ठरवले आहे. भारतीय संविधानातील कलम १४, १५ आणि १७ नुसार अस्पृश्यता पाळणे आणि जातीय भेदभाव करणे हा गुन्हा असतानाही, अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या भेदभावामुळे संबंधित वस्तीतील नागरिकांचे मूलभूत हक्क डावलले जात असून सवर्ण समाजाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणातील दोषी आयोजक आणि मानकऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच पोलीस बंदोबस्तात पालखी सर्व वस्तूंमधून नेण्याचे आदेश द्यावेत, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. जर यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा चर्मकार समाजाने दिला आहे, तसेच १६ मार्च रोजी राष्ट्रीय संघटनेमार्फत मोठ्या आंदोलनाची तयारीही दर्शवण्यात आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *