GRAMIN SEARCH BANNER

मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर; विहित मुदतीत परीक्षा अर्ज भरण्याचे विद्यापीठाचे आवाहन

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत पदवी स्तरावरील तृतीय वर्ष बी.कॉम., बी.कॉम. – फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्शुरन्स, अकाऊंटींग अँड फायनान्स, इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आणि बीएमएस सत्र ५ च्या परीक्षा ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहेत.

या परीक्षांसाठी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे अर्ज दाखल करण्याचा कालावधी १५ जुलै ते ३० ऑगस्ट असा निश्चित करण्यात आला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष सत्र ५ बी.एस्सी., बी.एस्सी. संगणकशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, विदाशास्त्र या परीक्षा १४ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे अर्ज महाविद्यालयाने विद्यापीठाकडे १५ जुलै ते ८ सप्टेंबर या कालावधीत जमा करायचे आहेत. तसेच मानव्यविज्ञान विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बी.ए. आणि बीएमएमसी सत्र ५ च्या परीक्षा १४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे अर्ज १५ जुलै ते ३० ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात जमा करायचे आहेत. त्याचबरोबर विधि सत्र ५ (तीन वर्षीय) आणि विधि सत्र ९ (पाच वर्षीय) या परीक्षा ३ डिसेंबरपासून नियोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे अर्ज १ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे जमा करायचे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील एमसीए सत्र १ ची परीक्षा १० नोव्हेंबर आणि एमसीए सत्र ३ ची परीक्षा २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच पदव्युत्तर स्तरावरील विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह इतरही सर्व परीक्षांचा तपशील मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील https://mu.ac.in/wp-content/uploads/2025/06/Exam-Submission-Form.pdf या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सर्व संबंधित महाविद्यालये आणि विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांनी मुंबई विद्यापीठामार्फत निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे पालन करून तथा विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी विहित मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाकडे सादर करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. तर विहीत मुदतीनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नसल्याची बाब सर्व संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणू द्यावी. तसेच परीक्षा अर्ज भरताना आणि निकाल जाहीर करताना ‘एबीसी आयडी’ आवश्यक असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी अपार आयडी तयार करण्याचेही आवाहन त्यांनी केले. तर परीक्षा विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाने आणि त्यांच्या चमूने या परीक्षांचे नियोजन केले आहे.

Total Visitor

0217627
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *