आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त फैसल मुल्ला मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत ‘रत्नदीप पाटीलवाडी’ संघ विजयी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: कोकणनगर येथे फैसल मुल्ला मित्रमंडळाच्या वतीने आमदार किरण भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा (२०२६) बक्षीस वितरण समारंभ नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्या कुमारी अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘रत्नदीप पाटीलवाडी’ संघाने ‘आहिल वॉरिअर घुडेवठार’ संघावर मात करून स्पर्धेच्या फिरत्या चषकावर आपले नाव कोरले.

या चुरशीच्या लढतीत रत्नदीप पाटीलवाडी संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. विजेत्या संघास रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, तर उपविजेत्या आहिल वॉरिअर संघालाही रोख रक्कम आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गौरव नागवेकर याला ‘मालिकावीर’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले.

या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. पूजाताई पवार, सौ. आफ्रीन होडेकर, सौ. रुख्सार खान आणि सौ. फौजिया मुजावर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच रज्जाकशेठ काझी, दीपक पवार, इलियास खोपेकर, तन्वीर मुजावर, जकी खान या मान्यवरांसह फैसल मुल्ला मित्रमंडळाचे कार्यकर्ते, खेळाडू आणि जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ४ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकूण ३२ नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. सलग पाच दिवस चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभाचा अंतिम थरार ८ जानेवारी रोजी रंगला. कठीण परिस्थितीच्या मैदानावर खेळाडूंना संधी उपलब्ध करून देत मित्रमंडळाने अत्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर आयोजन केल्याबद्दल कु. अपूर्वा सामंत यांनी फैसल मुल्ला मित्रमंडळाचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *