GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा

Gramin Varta
8 Views

चिपळूण: येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या दातार बेहेरे जोशी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाला आहे.नियमक समितीचे चेअरमन मंगेश तथा बाबू तांबे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.

महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध कारभार आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाविद्यालयास यू.जी.सी.कडून शैक्षणिक स्वायत्ततेचा दर्जा प्रदान करण्यात आला असून, त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आता अधिक व्यवसायाभिमुख व कालसुसंगत अभ्यासक्रमांची दारे खुली झाली आहेत. हा क्षण माझ्यासह सर्वांसाठी आनंदाचा आहे, असे श्री. तांबे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न राहून डॉ. दातार सायन्स, डॉ. बेहेरे आर्ट्स आणि पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालयाच्या माध्यमातून आता नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात होत आहे. ही स्वायत्तता हा केवळ सन्मानच नव्हे, तर कोकणातील उच्च शिक्षणाला दिशा देणारे पाऊल ठरणार आहे. स्वायत्ततेच्या अनुषंगाने महाविद्यालयास परीक्षा प्रणाली, अभ्यासक्रम रचना, निकाल व्यवस्थापन व अन्य शैक्षणिक बाबतीत अधिक अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना विद्यापीठाच्या प्रक्रियेसाठी वेळ खर्च करावा लागणार नाही. स्थानिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी व अंमलबजावणी महाविद्यालय स्तरावरच करता येणार आहे, असे श्री. तांबे यांनी सांगितले.शासनाच्या सर्व योजना, शिष्यवृत्ती, फी सवलती यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचा निर्वाळा संस्थेतर्फे देण्यात आला आहे. अभ्यासक्रमाच्या फीमध्येही वाढ होणार नाही, असेही बाबू तांबे यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षेच्या वेळेत येणाऱ्या अडचणी आता स्थानिक स्तरावरच सोडवल्या जातील. निसर्ग, पर्यटन, सागरी किनारा, औद्योगिक वसाहती यासारख्या कोकणातील वैशिष्ट्यांचा विचार करून नव्या अभ्यासक्रमांची आखणी करता येणार आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत नियामक समितीचे अध्यक्ष मंगेश तांबे, संचालक सुचयअण्णा रेडीज, अविनाश जोशी, संजीव खरे, निरंजन रेडीज, महेंद्र कानडे, फैसल कास्कर तसेच प्राचार्य बापट आणि समिती प्रमुख प्रा. शिल्पा सप्रे आदी सदस्य उपस्थित होते.

Total Visitor Counter

2645859
Share This Article