GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातील वडदहसोळ ग्रामस्थांचा संताप – तलाठी गैरहजर असल्याने नागरिकांना दाखले मिळण्यात अडचणी

संदीप पळसमकर यांचे तहसीलदारांना निवेदन

राजापूर : वडदहसोळ गावातील तलाठी सौ. पवार यांच्यावर शासकीय कामे वेळेवर न पार पाडणे, लोकसेवेत उपस्थित न राहणे, तसेच कोतवालाच्या मदतीने नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप संदीप पळसमकर यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राजापूर तहसीलदारांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, सौ. पवार यांची वडदहसोळ गावासाठी नियुक्ती झालेली असली तरी त्या नेहमी गैरहजर असतात. गावातील नागरिकांना आपल्या शासकीय कामांसाठी ओणी किंवा वाटुळ येथे बोलावले जाते, मात्र त्या स्वतः कधीही वडदहसोळमध्ये उपस्थित राहत नाहीत. गुरुवार दिनांक १९ जून २०२५ रोजी, सकाळी १० वाजता कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असतानाही त्या दुपारी १ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आल्याने, अनेक ग्रामस्थांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागली.

संदिप विठ्ठल पळसमकर आणि त्यांची पत्नी सौ. स्नेहल पळसमकर यांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी भेट दिली असता, त्यावेळी त्यांच्यामागे उभ्या असलेल्या महिलेकडून कोतवाल संतोष मिरजोळकर यांनी ५० रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला. सदर महिलेने ही माहिती श्री. पळसमकर यांना दिल्यानंतर त्यांनी त्याबाबत तलाठी मॅडमना विचारणा केली. यावेळी त्यांनी उद्धट भाषेत उत्तर दिले व “तुमच्याकडे पैसे मागितले का?” असा प्रतिप्रश्न केला.

श्री. पळसमकर यांनी प्रश्न उपस्थित केला की जर माझ्याकडून पैसे मागितले नाहीत, तर इतरांकडून पैसे का मागितले जात आहेत? यावर त्या म्हणाल्या की “ध्वज निधी” साठी पैसे घेतले जात आहेत आणि त्यासाठी पावती दिली जाते. मात्र जेव्हा पावती पुस्तिकेबाबत विचारणा केली, तेव्हा तलाठी म्हणाल्या की “ती सध्या ओणी कार्यालयात आहे”. यावरून हे स्पष्ट होते की तलाठी आणि कोतवाल हे दोघे मिळून नागरिकांकडून अनधिकृतरित्या पैसे गोळा करत असून ध्वज निधीच्या नावाखाली राष्ट्रीय ध्वजाचा अपमान देखील करत आहेत.

या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, तलाठी आणि कोतवाल हे शासकीय पदाचा दुरुपयोग करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोतवाल संतोष मिरजोळकर यांचे बँक खाते तपासून चौकशी करावी, दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी आणि या प्रकरणाचा चौकशी अहवाल तातडीने सादर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तसेच, या दोघांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.

Total Visitor

0225006
Share This Article