प्रवाशांच्या सुरक्षितेत वाढ; गुन्हेगारीला बसणार आला
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या आणि सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन, रत्नागिरी येथे नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या पोलीस ठाण्याचे उद्घाटन पोलीस महासंचालक (लोहमार्ग), महाराष्ट्र राज्य, श्री प्रशांत बुरडे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या नव्या पोलीस ठाण्यामुळे कोकण रेल्वेच्या हद्दीतील प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि प्रभावी पोलीस यंत्रणा उपलब्ध होणार आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार रेल्वे विभागात होत असलेले बदल, प्रवाशांची वाढती संख्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हार्बर लोहमार्ग परिमंडळ, कोकण लोहमार्ग विभाग तसेच रोहा, रत्नागिरी आणि कणकवली या ठिकाणी नवीन लोहमार्ग पोलीस ठाणी सुरू करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांनी (नि. व. स.), महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून ७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता मिळाली. त्यानुसार, रत्नागिरी येथे हे पहिले पोलीस ठाणे सुरू झाले आहे.
या पोलीस ठाण्याच्या निर्मितीमध्ये केंद्रीय रेल्वे, केंद्रीय रेल्वे सुरक्षा दल आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे सहकार्य लाभले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये लोहमार्ग पोलीस आयुक्त, श्री एम. राकेश कलासागर, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री संतोष कुमार झा, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री एम. देवेंदर सिंह, आणि पोलीस अधीक्षक, श्री नितीन बगाटे यांच्यासह इतर मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते.
या नव्या पोलीस ठाण्यामुळे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही वाढ झाली आहे. आता पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे आणि रोहा ही स्थानके देखील समाविष्ट करण्यात आली आहेत. रत्नागिरी आणि पनवेल ही दोन्ही पोलीस ठाणी आता सहायक पोलीस आयुक्त, हार्बर विभाग यांच्या अंतर्गत काम करतील आणि पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ यांच्या थेट नियंत्रणाखाली असतील.