रत्नागिरी : शहराजवळील मिऱ्या गावात पार पडलेल्या सिरॉक्स फिशिंग टूर्नामेंटमध्ये रत्नागिरीतील हौशी मासेमारांनी उत्साहाने सहभाग घेत पारीतोषिके पटकावली. मिऱ्या पर्यटन सहकारी संस्था आणि अॅंगलर क्लब रत्नागिरी यांच्या सौजन्याने आयोजित या मासेमारी स्पर्धेत मुंबई, सिंधुदुर्ग, रायगडसह सुमारे 130 स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेत सोहेब बुडये प्रथम अनिकेत निरोखेकर द्वितीय, अवधूत तांडेल याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरी शहरासह महाराष्ट्रातील पर्यटकांना मिऱ्या येथील निसर्गसंपन्न समुद्रकिनाऱ्याची नव्याने ओळख झाली. निसर्गाच्या सान्निध्यात खडकाळ समुद्रकिनारी मासे पकडायचे आणि त्याचे वजन नोंदवून पुन्हा समुद्रात सोडायचे — असे या स्पर्धेचे निकष होते. तर सुबोध पडवळ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
माशांच्या विविध प्रजाती स्पर्धकांच्या गळाला लागल्या. त्यात स्टिंगरेस्ट, मोडोसा, रेड स्नॅपर, जिती, आणि कॅट फिश या माशांचा समावेश होता. ज्या स्पर्धकांच्या गळाला सर्वाधिक वजनाचा मासा लागला तो विजेता ठरवण्यात आला. ही स्पर्धा पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी एक अनोखा उपक्रम ठरली.
सायंकाळी उशिरा या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. यामध्ये सोहेब बुडये याला 472 ग्रॅम वजनाचा मासा गळाला लागल्याने पहिला क्रमांक मिळाला. अनिकेत निरोखेकर याने 437 ग्रॅम वजनाच्या तांबोशी जातीच्या माशासाठी दुसरे पारीतोषिक, तर अवधूत तांडेल याला 370 ग्रॅम वजनाचा मासा गळाला लागल्याने तिसरे पारीतोषिक मिळाले.
या स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरी शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मिऱया सिरॉक्स परिसरात गर्दी केली होती.
रत्नागिरीतील मासेमारी स्पर्धेत सोहेब बुडये विजेता, 130 जणांनी घेतला सहभाग





