लांजा : तालुक्यातील कांटे गावच्या एका ३१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभव सुरेश सरफरे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव याने गेल्या मंगळवारी (दि. २४ मार्च २०२६) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या कांटे येथील राहत्या घरी कोणत्याही कारणाने विषारी औषध प्राशन केले होते. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे हलवण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती कोल्हापूर पोलिसांनी लांजा पोलिसांना कळवल्यानंतर शनिवारी दुपारी २:१८ वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. लांजा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ऐन तरुण वयात वैभवने टोकाचे पाऊल उचलल्याने कांटे गावावर शोककळा पसरली असून, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





