रत्नागिरी: निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर आज ( रविवार) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोन सदस्य समुद्रात बुडाले असून, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दुसऱ्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब रविवारी सकाळी रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी दाखल झाले होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सदस्य समुद्राचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली हे दोघेही ओहोटीच्या प्रवाहात ओढले गेले आणि बुडू लागले.
यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलीस पाटील आदेश कदम यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून समुद्रात धाव घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुखरूप बाहेर काढले. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.





