GRAMIN SEARCH BANNER

राजापूरच्या खड्डेमय रस्त्यामुळे संताप; दुरुस्ती न झाल्यास उपोषणाचा इशारा

Gramin Varta
230 Views

तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्यातील राजापूर–शीळ–गोठणे–सौंदळ तसेच राजापूर–डोंगर–सागवे या प्रजिमा ६८ आणि ७२ मार्गांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थ्यांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या दोन्ही मार्गांवरून कोंढेतड, शेडे, डोंगर, विल्ये, नाणार, कुंभवडे, सागवे, जैतापूर आदी गावांकडे मोठी वाहतूक होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने पर्यटकांचीही कायम वर्दळ असते.

मात्र रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांना धोका निर्माण झाला आहे. प्रवाशांना शारीरिक त्रास तर होतोच, पण वाहनेही वारंवार नादुरुस्त होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे दृष्टीआड होणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोंढे तर्फे राजापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि सामाजिक युवा कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर उपविभागातील मा. उपअभियंत्यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली.

निवेदनात लांजेकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “पुढील एका महिन्यात खड्डे बुजवून रस्ते सुरळीत वाहतुकीसाठी तयार न केल्यास आणि वाढलेली झाडी न कापल्यास, आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.”

स्थानिक नागरिकांनीही रस्त्यांची बिकट अवस्था लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पावसाळ्यापूर्वी किंवा वाहतूक वाढण्यापूर्वी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे.

Total Visitor Counter

3368462
Share This Article