GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीसह पश्चिम घाटात मंकी फिव्हरचा धोका संपणार; भारतीय संशोधकांनी विकसित केली पहिली स्वदेशी लस

Gramin Varta
132 Views

नवी दिल्ली: महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमावर्ती भागात दरवर्षी चिंतेचा विषय ठरणाऱ्या ‘कॅसानूर फॉरेस्ट डिसीज’ म्हणजेच ‘मंकी फिव्हर’ या आजारावर भारतीय संशोधकांनी मोठे यश संपादन केले आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) या जीवघेण्या आजारावर पूर्णतः स्वदेशी बनावटीची, सुधारित आणि अधिक प्रभावी लस विकसित केली असून, या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या टप्प्याला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.

या महत्त्वाकांक्षी संशोधनामुळे विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील दुर्गम भागांत राहणाऱ्या नागरिकांना आणि वन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. १९५७ मध्ये कर्नाटकच्या कॅसानूर जंगलात प्रथम आढळलेला हा ‘टिक-बॉर्न’ विषाणू प्रामुख्याने गोचिडांमार्फत पसरतो, जो बाधित माकडांपासून मानवापर्यंत पोहोचतो. या आजारात अचानक तीव्र ताप, उलट्या आणि रक्तस्राव यांसारखी गंभीर लक्षणे दिसतात, ज्यामध्ये मृत्यूदर १० टक्क्यांपर्यंत असल्याने यावर लस येणे अत्यंत गरजेचे होते.

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काम करणारे शेतकरी आणि लाकूडतोड्यांसाठी ही लस एक सुरक्षा कवच ठरणार आहे. विशेष म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड यांनी संयुक्तपणे तयार केलेली ही ‘अॅडज्युव्हांटेड इनएक्टिव्हेटेड’ लस दोन मात्रांची असून, २८ दिवसांच्या अंतराने तिचे डोस दिले जातील. उन्हाळ्याच्या काळात जेव्हा या आजाराचा प्रादुर्भाव शिखरावर असतो, तेव्हा ही स्वदेशी लस पश्चिम घाटातील जनजीवनासाठी संजीवनी ठरणार आहे.

Total Visitor Counter

3366995
Share This Article