मिरजोळे परिसरात पोलिसांचा छापा; एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा गावठी दारूसाठा हस्तगत

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरजोळे परिसरात अवैध दारूधंद्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सुमारे एक लाख सात हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टीचे रसायन आणि तयार दारू जप्त केली आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास मिरजोळे येथील नाखरेकरवाडी भागातील झाडीझुडपांच्या आडोशाने सुरू असलेल्या या हातभट्टीवर पोलिसांनी हा छापा टाकला. या प्रकरणी सुनील सदाशिव जाधव (वय ५४, रा. मिरजोळे बौद्धवाडी) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद बाबल्या कांबळे आणि त्यांच्या पथकाने नाखरेकरवाडी येथील दुर्गम भागात छापा टाकला असता, संशयित आरोपी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ५,४५० रुपये किमतीचे दारू गाळण्याचे साहित्य आणि बॅरल, तसेच १२ लोखंडी बॅरल्समध्ये भरलेले सुमारे २२५० लिटर गूळ व नवसागर मिश्रित कुजके रसायन जप्त केले, ज्याची किंमत ८१,१५० रुपये इतकी आहे. याशिवाय प्लास्टिक बॅरल्समधील ४०० लिटर रसायन आणि ३,७०० रुपये किमतीची ३५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू असा एकूण १,०७,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी दारू गाळण्यासाठी लागणारी ॲल्युमिनियमची डेग, प्लास्टिक पाईप आणि लाकडी चाटू यांसारखे साहित्यही जप्त केले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशी अवैध दारू तयार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पवित्रा घेतला असून या कारवाईमुळे मिरजोळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत असून शहरालगतच्या ग्रामीण भागात अशा प्रकारे सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *