GRAMIN SEARCH BANNER

गुहागर-विजापूर मार्गावर धुळीचा त्रास

Gramin Varta
49 Views

खड्ड्यांमुळे प्रवास नकोसा; आरोग्यही धोक्यात

चिपळूण: माती, खडी टाकून खड्डे बुजवण्याचा दिखावा गुहागर-विजापूर मार्गावर चिपळूण तालुक्यात करण्यात आला; परंतु आता पाऊस थांबला असल्याने धुळीचे कण नाकातोंडात जात आहेत. त्यामुळे प्रवाशांसह चालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे खोकला, सर्दी, घसा दुखण्यासारखे आजार वाढण्याची भौती निर्माण झाली आहे. या धुळीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

गुहागर-विजापूर मार्गावर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यापूर्वी तीन महिने अगोदर डांबरीकरण केलेल्या या मार्गावर ठिकठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात माती, खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. पावसाळ्यात चिखलातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली होती.

या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू आहे. आता पाऊस थांबल्याने या वर्दळीमुळे रस्त्यांवरील खडी, धूळ उडत आहे. या धुळीचे कण अनेकांच्या नाकातोंडात जात आहेत. त्यामुळे काहीजण नाक दाबून, तर काहीजण तोंडाला कपडा बांधून प्रवास करत आहेत. दुचाकीचालकासह तीनचाकी, चारचाकी चालकांना आणि पादचारी प्रवाशांना या धुळीचा त्रास होत आहे. बुधवारी (ता. १५) सायंकाळी कोसळलेल्या पावसानंतर खड्यात टाकण्यात आलेली माती पुन्हा रस्त्यावर आली. त्यामुळे चिखल तयार झाला होता. या चिखलातून प्रवास करण्याची वेळ वाहनचालकांवर आली.

गुहागर-विजापूर मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याची सूचना ठेकेदारांना केली आहे. याबाबत लेखी पत्र दिले आहे. लवकरच रस्त्यांची योग्य दुरुस्ती केली जाईल.- जगदीश सुखदेवी, कार्यकारी अभियंता, चिपळूण

Total Visitor Counter

2677186
Share This Article