पोलिसांच्या निवासस्थानांसाठी १६० कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी: कर्तव्यावर असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पोलीस स्मृती दिन आज रत्नागिरी पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी हुतात्मा पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा पोलीस जवानांची नावे सन्मानपूर्वक वाचण्यात आली. त्यानंतर शोकसंगीताच्या निनादात सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी देशातील अंतर्गत शांती आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस जवान अहोरात्र कसे कर्तव्य बजावतात, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आपण सुरक्षित आहोत, ते केवळ या शूर जवानांच्या त्यागामुळेच. समाजाने या वीरांचे ऋण मानावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना नेहमी सन्मान द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पोलिसांच्या सुखसोयींसाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा शब्द दिला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची तसेच एस.पी. कार्यालयाच्या उभारणीची मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली असून, यासाठी १६० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या निधीमुळे रत्नागिरीतील पोलिसांना चांगल्या सोयी-सुविधा मिळणार आहेत. या सोहळ्याला पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांसह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.