रत्नागिरी: वीज कायदा २०२३च्या नियमांनुसार महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर ग्राहकांना नियमानुसार व्याज दिले जात आहे. याच व्याजापोटी जिल्ह्यातील लघुदाब व उच्चदाब वर्गातील ६ लाख २६ हजार १२५ ग्राहकांना ६ कोटी ५९ लाखांचा परतावा दिला जाणार आहे. ही रक्कम ग्राहकांच्या मासिक वीज बिलात थेट जमा करून समायोजित केली जात आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित बँक दराच्या प्रमाणात किंवा विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसार जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर महावितरणकडून वार्षिक व्याज दिले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ६ लाख २६ हजार १२५ ग्राहकांना ६ कोटी ५९ लाख रुपये परतावा देण्यात येणार आहे. यामध्ये लघुदाब ग्राहक परतावा म्हणून चिपळूणमध्ये १,६३,४७८ ग्राहकांना ०.६३ लाख, खेडमध्ये १,६५,७१७ ग्राहकांना ०.७५ लाख, आणि रत्नागिरीमध्ये २,९६,९५४ ग्राहकांना १.६८ लाख असा एकूण ६,२५,८४९ ग्राहकांना ३.०६ लाख रुपये परतावा मिळणार आहे. तसेच उच्चदाब ग्राहक परतावा म्हणून चिपळूणमध्ये ५२ ग्राहकांना ०.६९ लाख, खेडमध्ये ९३ ग्राहकांना १.४४ लाख, आणि रत्नागिरीमध्ये १११ ग्राहकांना १.३९ लाख असा एकूण २५६ ग्राहकांना ३.५३ लाख रुपये परतावा देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार व वीज कायद्यातील तरतुदीनुसार सर्व वर्गातील वीज ग्राहकांना महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे अनिवार्य आहे. भविष्यातील संभाव्य थकीत बिलाच्या जाखमीपासून संरक्षणासाठी ही अनामत रक्कम जमा करून घेतली जाते. विद्युत आयोगाकडून दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणा केली जाते आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर वीज ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित केली जाते. ग्राहकांना मिळणारे व्याज त्यांच्या मासिक वीज बिलातून वजा करून त्यांना परतावा दिला जातो. ग्राहकांनी आपल्या बिलात सुरक्षा ठेवीची व व्याजाची नोंद तपासणे गरजेचे आहे.
महावितरणचा मोठा दिलासा: जिल्ह्यातील ६ लाखाहून अधिक वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवर व्याजाचा परतावा!
Leave a Comment






