रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री ११:३० वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काल रात्री 11.30 वाजता झालेल्या या अपघातानंतर अखेर 15 तासानंतर आज दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणांना यश आले.
टँकरमधील गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हातखंबा गावाजवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अपघातस्थळी गॅस टँकरमधील गॅस रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर दाखल झाला होता. त्यानंतर पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात आले. पोलिस यंत्रणेसह सारी यंत्रणा कामाला लागली होती.
या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आल्याने महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते. महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी जवळपास 15 तासाचा कालावधी लागला. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आल्याने अखेर आज दुपारी 1.45 च्या दरम्याने वाहतूक सुरळीत झाली.
अखेर 15 तासानंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत, गॅस वाहू टँकर काढण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश
