खेड: मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे ओव्हरब्रिजजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये एका ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अमित सूर्यकांत फावरे (रा. आवाशी माळवाडी, ता. खेड) असे या मयत तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने वेटर म्हणून कार्यरत होता.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास अमित फावरे हे भरणे ओव्हरब्रिज परिसरातील महामार्गावरून जात होते. यावेळी मुंबईकडून गोव्याच्या दिशेने अतिवेगात जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने अमित यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अमित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक जखमीला मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या प्रकरणी मयताचे वडील सूर्यकांत तुकाराम फावरे (वय ६५) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(२), २८१, १२१(३५), १२५(ब) सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(अ), १३४(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. १८ एप्रिल रोजी पहाटे या अपघाताची अधिकृत नोंद करण्यात आली असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे फरार वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे आवाशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






