गुहागर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि संपूर्ण जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी विशेष भेट देऊन गोपाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि मानवंदना दिली.
या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी आमदार प्रमोद जठार यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी उपस्थित राहून शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा केला.
शिवराज्याभिषेक दिनाचे गांभीर्य आणि उत्साह लक्षात घेऊन गडावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, अक्षय पवार, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिक आणि असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण गोपाळगड परिसर दुमदुमून गेला होता आणि उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.






