राजापूर : औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या नावाने एक बनावट अधिसूचना तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट अधिसूचनेमुळे स्थानिक नागरिक आणि संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीचे अधिकारी पद्माकर सीताराम कनावजे (वय ४५, रा. आर-११५, झाडगाव, एमआयडीसी कॉलनी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.५४ वाजण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अधिनियम १९६१ च्या कलम ६ अंतर्गत मौजे आंबोळगड, ता. राजापूर येथील क्षेत्रासाठी एक बनावट अधिसूचना तयार केली. ही अधिसूचना दिनांक २१ जुलै २०२५ पासून लागू झाल्याचे दाखवण्यात आले होते. ही बनावट अधिसूचना खरी असल्याचे भासवून ती वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रसारित करण्यात आली. या बनावट अधिसूचनेमुळे एमआयडीसीच्या कामकाजाबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि लोकांमध्ये चुकीची माहिती पसरली. ही बाब गंभीरतेने घेत, पद्माकर कनावजे यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.२४ वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या तक्रारीनुसार, गु.आर.नं. ५३/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३६(२), ३३६(३), आणि ३४०(१) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, बनावट अधिसूचना तयार करून ती प्रसारित करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच ती पुढे प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणतीही अधिकृत माहिती केवळ सरकारी किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे आणि ती प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
राजापुरात एमआयडीसी होणार ? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी अज्ञातावर पुन्हा
