GRAMIN SEARCH BANNER

आरवली गावात जपल्या जात आहेत स्वातंत्र्याच्या ताम्रपटाच्या आठवणी 

  सदाशिव सरदेशपांडे उर्फ कुलकर्णी यांना मिळाला होता इंदिरा गांधींच्या हस्ते ताम्रपट

सचिन यादव /धामणी
स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतलेली पिढी आता बहुतांश अस्ताला गेली आहे. पण त्यांना मिळालेले सन्मान हे पुढच्या अनेक पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. असाच एक ठेवा ताम्रपटाच्या स्वरुपात आरवली इथल्या सरदेशपांडे उर्फ कुलकर्णी घराण्यात अभिमानाने जपला जातोय.

सदाशिव लक्ष्मण सरदेशपांडे उर्फ कुलकर्णी हे मूळचे लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावाचे. पण त्यांच्या आधीच्या काही पिढ्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावात जावून स्थायिक झाल्या. सदाशिव सरदेशपांडे उर्फ कुलकर्णी यांनी देशसेवेचे व्रत घेतलं होतं. त्यासाठी ते आजन्म अविवाहित राहिले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी वयाच्या जेमतेम तेरा ते चौदाव्या वर्षी त्यांनी आपलं आरवली इथलं घर सोडलं. देशसेवा, सत्याग्रह, असहकार यांचा तो काळ होता. सहाजिकच सदाशिव यांनीही त्यात उडी घेतली. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात ते सामील झाले. दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर झालेल्या आंदोलनातही ते सभागी झाले होते.  जालियनवाला बाग हत्याकांड घडलं तेव्हाही ते पंजाब प्रांतातच होते. त्यामुळे त्यावेळची तिथली परिस्थिती त्यांनी जवळून अनुभवली होती.

१९४७ साली देशानं स्वातंत्र्य मिळवल्यावर सदाशिव सरदेशपांडे उर्फ कुलकर्णी आपल्या मुळगावी आरवली इथे परत आले. त्यानंतर १९९३ साली त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचं वास्तव्य आरवली इथेच होतं. परत आल्यावर स्वातंत्र्य लढ्यातील आठवणी ते आवर्जून कुटुंबातल्या प्रत्येकाला सागत असत. स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात केलेल्या त्यागाचं मोल त्यांना सतत होतं. म्हणूनच शेवटपर्यंत स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताक दिनी आणि महाराष्ट्र दिनी ते नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात झेंडावंदनाला जात असत.

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाला १५ ऑगस्ट १९७२ ह्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्यांचा विशेष सत्कार तात्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना एक ताम्रपट सन्मानानं बहाल करण्यात आला होता. आजही तो ताम्रपट त्यांचे पुतणे आणि वाहिनी प्रसाद गोविंद कुलकर्णी आणि अन्नपूर्णा गोविंद कुलकर्णी यांनी जतन केला आहे. त्यानंतर १९६७ साली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना मंत्रालयात सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. ते सन्मानपत्रही आरवलीच्या घरात कुलकर्णी कुटुंबियांनी जपून ठेवलं आहे.

Total Visitor Counter

2475142
Share This Article