GRAMIN SEARCH BANNER

राजापूर उड्डाणपुलावर अखेर दुहेरी वाहतूक सुरू; ॲड. जमीर खलिफे आणि अरविंद लांजेकरांच्या प्रयत्नांना यश!

Gramin Search
7 Views

राजापूर: राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरच्या उड्डाणपुलाच्या एका बाजूचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने, आता या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे आणि भाजपचे अरविंद लांजेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळालं असून, सोमवारी सकाळपासूनच पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ सुरू झाल्याने वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर हद्दीतील बहुतांश काम पूर्ण झालं आहे, मात्र शहरातील डेपोसमोरील उड्डाणपुलाच्या एका बाजूकडील कामात काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला होता. त्यामुळे आजवर या पुलाच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू होती. एकाच मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता, परिणामी रखडलेलं काम तातडीने पूर्ण करून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. याची दखल घेत ॲड. खलिफे आणि लांजेकर यांनी महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

गेल्या महिन्यात उड्डाणपुलाच्या रखडलेल्या एका बाजूचे काम सुरू झाले खरे, पण कामाची गती अत्यंत संथ होती. त्यामुळे ॲड. खलिफे आणि लांजेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. कुमावत यांच्यासह सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच, आमदार किरण सामंत यांनीही काही दिवसांपूर्वी महामार्गाची पाहणी करत उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

या सर्व प्रयत्नांना यश येऊन सोमवारपासून उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूनेही वाहतूक सुरू करण्यात आली. राजापुरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, महामार्ग तसेच ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी दीपक नागले, अरविंद लांजेकर, सुभाष बाकाळकर, शैबाज खलिफे, भरत लाड, अजीम जैतापकर, शैलेश साळवी, लीलाधर गुरव, रवींद्र सावंत, श्री. आंबोळकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. कुमावत, ठेकेदार कंपनीचे श्री. मनिंदर आणि श्री. शर्मा आदी उपस्थित होते. दुहेरी वाहतूक सुरू झाल्यामुळे राजापूरमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असून, प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

Total Visitor Counter

2648076
Share This Article