श्रमदान, वर्गणी आणि लोकसहभागाचा आदर्श; पर्यटकांसाठी ठरणार नवे आकर्षण
संगमेश्वर प्रतिनिधी : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे गावाने एकजुटीची ताकद दाखवत श्रद्धा, परंपरा आणि लोकसहभागाचे प्रतीक ठरणारे भव्य रत्नेश्वर मंदिर उभारले आहे. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आणि वर्गणीच्या माध्यमातून साकारलेले हे मंदिर आता परिसरातील भाविकांसह पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहे.
मंदिर उभारणीचे काम हे केवळ बांधकामापुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावाच्या सहभागातून पार पडले. गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांपर्यंत सर्वांनी आपल्या परीने योगदान देत या उपक्रमात सहभाग नोंदविला. अनेकांनी श्रमदान केले, तर काहींनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. गावाच्या विकासासाठी आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली ही एकजूट विशेष कौतुकास्पद मानली जात आहे.
मंदिराच्या उभारणीसाठी विविध दानशूर व्यक्तींनीही उदार हस्ते देणगी दिली. त्यामुळे ग्रामस्थांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून आज कोळंबे गावाच्या वैभवात या मंदिरामुळे भर पडली आहे. आकर्षक वास्तुरचना, परिसरातील निसर्गसौंदर्य आणि धार्मिक वातावरण यामुळे रत्नेश्वर मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान तर पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून उभे राहिलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक ऐक्य, श्रमसंस्कृती आणि गावाच्या विकासाची प्रेरणादायी कहाणी बनले आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारले कोळंबेचे भव्य आकर्षक रत्नेश्वर मंदिर






